भुवनेश्वर - साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ओडिशाच्या लेखिका बीनापानी मोहंती यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. महिला केंद्रित लिखाणासाठी त्या परिचित आहेत. आयुष्यात सर्व काही आईमुळेच मिळाले. त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय आईलाच जाते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महिला दिवसाच्या निमित्ताने महिलांनी एकजूट दाखवली पाहिजे. त्याचबरोबर समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी संकल्प केला पाहिजे, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. आलेल्या संकटांना तोंड देत महिलांनी स्वत:ला कुणापेक्षाही कमी लेखू नये, असा सल्ला मोहंती देतात.
वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी लिखाण सोडले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते सुरूच ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती खालवली आहे. देवाची कृपा आहे, तोपर्यंत लिहीत राहणार, असे त्या सांगतात.
महिला दिन विशेष: महिलांचा आवाज लेखणीतून मांडणाऱ्या बीनापानी मोहंतींना 'पद्मश्री' हेही वाचा -समाजाची मानसिकता का बदलतेय ? अहमदनगरच्या 'त्या' घटनेचा आमदार भारती लव्हेकरांकडून निषेध
'महिला फक्त हाडामासाची मूर्ती नाही'
बीनापानी म्हणतात, महिला केवळ हाडामासाची मूर्ती नाही, हे सांगण्याचा मी प्रत्येक कांदबरीत प्रयत्न केला आहे. महिला कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नाही. गरज पडल्यास ती काहीही करू शकते. आपला इतिहास आणि प्राचीन कथांमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत.
'मुलींनी निर्भय राहावे'
आपल्याला वास्तविक स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल, जेव्हा आपल्या घरातील पोरीबाळी निर्भयपणे वावरू शकतील, असे महात्मा गांधी बोलले असल्याची आठवण बीनापानी सांगतात. मात्र, आता दररोज बलात्काराची प्रकरणे पुढे येत आहेत. निर्भया प्रकरणातील पीडिता गेल्या ७ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी का दिली जात नाही, हे मला समजत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणासाठी बीनापानींचा खडतर प्रवास
शिक्षणाच्या ध्यासापोटी बीनापानी ८ किलोमीटर दूर शाळेत पायी जायच्या. या त्यांच्या प्रवासात त्यांच्या आईने त्यांना मोलाची साथ दिली. जगाला जाणून घेण्यासाठी मदत करणारी आईच माझी प्रेरणा, असे त्या सांगतात. आंतरिक शक्तीच्या माध्यामातून सशक्तीकरण होऊन महिला आत्मनिर्भर होऊ शकतात, असा सल्लाही त्या देतात