मुंबई :सहा महिन्यांपासून देश कोरोनासारख्या महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे सर्वच जण जीवाची बाजी लावत कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोना योध्दे म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र त्याचवेळी आरोग्य क्षेत्रातील एक घटकही कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, तरीही हा कमालीचा दुर्लक्षित राहिला आहे. ना यांच्या कामाची कोणी योग्य दखल घेत आहे, ना त्यांना 'कोरोना योध्दा' म्हणून संबोधले जात आहे. कोरोना काळात महत्वाची सर्व औषधांची, इतकेच नव्हे तर कोरोनावरील लशीची निर्मिती करण्यापासून ते औषध दुकानात येणाऱ्यांना औषधे देत रुग्णांचे-नागरिकांचे समुपदेशन करण्यापर्यंत महत्वाचे काम हा घटक करत आहे. ते म्हणजे फार्मासिस्ट!
25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. पण यंदा मात्र हा दिवस साधेपणाने जगभर साजरा होत आहे. आज देशात सुमारे 15 लाखांहुन अधिक नोंदणीकृत फार्मासिस्ट आहेत. यात महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख फार्मासिस्टचा समावेश आहे. यातील कुणी औषध कंपन्यामध्ये औषधे तयार करण्याचे काम करत आहे, तर कुणी औषधांवर संशोधन करत आहे तर कुणी सरकारी-खासगी रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याचवेळी औषध दुकानाचा परवाना स्टेट फार्मसी कौन्सिल नोंदणीकृत फार्मासिस्टलाच दिला जातो. त्यामुळे औषध दुकान मालक म्हणून तसेच औषध दुकानात फार्मासिस्ट म्हणूनही सेवा देत आहेत. औषध निर्मिती पासून औषधांचे वितरण करणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. हे काम फार्मासिस्ट करतात.