लखनऊ - कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हाथरस, बलरामपूर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले असून योगी आदित्यनाथ सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. आज समाजवादी पक्षाचे नेते आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. उत्तर प्रदेशात जंगलराज पसरल्याचा आरोप काँग्रस नेत्यांनी केला आहे.
पोलिसांची आंदोलकांना मारहाण समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते शहरातील गांधी पुतळ्याकडे मूक मोर्चा घेवून चालले होते. ढासळती कायदा सुव्यवस्था, महिलांविरोधातील वाढते गुन्हे, बेरोजगारी आणि नुकतेच मंजूर करण्यात आलेले कामगार आणि शेतीविषयक कायद्यांविरोधात समाजवादी पक्षाने सत्याग्रह पुकारला आहे. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यात अडविले. कार्यकर्ते मागे हटत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.
शहरातील जीओपी पार्क येथे गांधी पुतळा आहे. आज महात्मा गांधींची १५१ वी जंयती आहे. मात्र, आंदोलक तेथे येत असल्याचे पाहून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले. यासोबतच शहरातील समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेड लावण्यात आले असून नेत्यांच्या हालचालींवर निर्बंध आणण्यात आले आहेत.
पोलिसांची आंदोलकांना मारहाण हाथरसमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. माध्यम प्रतिनिधींनाही जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमेवरच रोखले आहे. यावेळी डेरेक ओ ब्रायन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, या प्रकरणावरून राजकारण करू नका, अशी विनंती त्यांनी सर्वांना केली. तसेच दिल्लीतील दोन नेते आणि योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारा, असे ते म्हणाले. दिल्लीतील दोन नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे त्यांचा रोख होता. काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी हाथरसला जाऊ दिले नाही. यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. यावेळी ते खालीही पडले. पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.