लखनौ - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. परराज्यात अडकलेल्या मजुरांना प्रियजनांचा मृत्यू झाल्यानंतरही गावी जाता येत नाही. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर तीन मुलांना अंत्यसस्काराला येता न आल्याने वृद्ध पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने पतीवर अंत्यसंस्कार केले.
संतराम शर्मा(७०) यांची प्रकृती अचानक बिघडली. रुग्णालयात नेण्यासाठीही कोणी नव्हते. शेजारील नागरिक दवाखान्यात नेण्याच्या तयारीत होते. मात्र, तोपर्यंत संतराम यांच्या मृत्यू झाला.
तिन्ही मुले अडकली परराज्यात
गावात काही कामधंदा नसल्याने त्यांची तीन्हीही मुले परराज्यात रोजगाराच्या शोधात गेली आहेत. एक मुलगा महाराष्ट्रात, दुसरा हरियाणात आणि तिसरा पंजाबात अडकून पडला आहे. लॉकडाऊन असल्याने त्यांचा घरी येता येईना. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर पोलिसांची परवानगी मिळविण्यासाठी मुलांनी प्रयत्न केला मात्र, परवानगी मिळाली नाही.
व्हिडिओ कॉलद्वारे पाहिला वडिलांचा अंत्यसंस्कार
मुलांना येणं शक्य नसल्याने संतराम यांची पत्नी कैलासी देवी यांनी पतीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मुलांनी वडिलांचे शेवटचे दर्शनही व्हिडिओ कॉलद्वारेच घेतले.