नवी दिल्ली- संपूर्ण देशाला भाजपपासून धोका असताना शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले असून हा कार्यक्रम लागू करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, असे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या शपथविधी कार्यक्रमासाठी येता येणार नसल्याने त्यांनी दु:ख व्यक्त केले. सोनिया गांधीनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीसाठी पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपपासून देशाला धोका असताना महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार - सोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र
सोनिया गांधीनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीसाठी पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या काळात संपूर्ण देशाला भाजपासून धोका असताना शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्ष एकत्र आले असल्याचे त्या म्हणाल्या.
देशातील राजकीय वातावरण दुषित झाले आहे. अर्थव्यवस्था ढासळत आहे, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष मिळून किमान समान कार्यक्रमावर काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी मिळून जबाबदार आणि निष्पक्ष सरकार महाराष्ट्राला देतील, असे गांधी म्हणाल्या. आदित्य ठाकरे यांनी काल(मंगळवारी) भेटून शपथविधी कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला.
राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रिपदावरील सत्तापेच सुटला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी हे सरकार स्थापन करणार आहे.