नवी दिल्ली -आज सकाळी पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेसमध्ये 'हाय वोल्टेज ड्रामा' सुरू झाला होता. अखेर यावर पडदा पडला असून पुन्हा सोनिया गांधीच पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सीडब्ल्यूसीने या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. आपल्याला पक्षाध्यक्षपदी पुढे रहायचे नाही. परंतु अनेक नेत्यांनी पदावर कायम राहण्याचे आवाहन केले आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
निर्णय झाला... काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम - Congress party
आज सकाळी पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेसमध्ये 'हाय वोल्टेज ड्रामा' सुरू झाला होता. अखेर यावर पडदा पडला असून पुन्हा सोनिया गांधीच पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व असावे, अशी मागणी करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षात 'हाय वोल्टेज ड्रामा' सुरू झाला होता. काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र लिहणाऱ्या 23 वरिष्ठ नेत्यांमध्ये कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद हे आहेत. या पत्रावरून आज बैठकीत घमासान झालं. आज बैठकीत सोनिया गांधीनी या पत्राचा संदर्भ देत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला होता.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर गांधी कुटुंबाकडेच पक्ष नेतृत्व ठेवावं, अशी मागणी करण्यात येत होती. पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी राहुल हेच पक्ष नेतृत्वासाठी योग्य असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया कांग्रेस कमेटी (AICC) कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शन केली. पक्षाचा अध्यक्ष गांधी परिवारातूनच असला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.