नवी दिल्ली- सोनिया गांधी यांची चौथ्यांदा काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली होती. मात्र, हा प्रस्ताव फेटाळून राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे.
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राजबब्बर, अमेठीचे जिल्हाप्रमुख तसेच कर्नाट प्रचार व्यवस्थापक, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष आदींनी राजीनामे दिले आहेत. या सर्व मुद्दय़ांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.