नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात येणार आहे.
राजघाटावरील धरणे प्रदर्शनामध्ये काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी होतील. हे प्रदर्शन दुपारी 2 वाजता सुरू होईल. तर रात्री 8 वाजता समाप्त होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
14 डिंसेबरला रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसकडून पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर ला देशभरामध्ये ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
पक्षाचे अध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख देशातील विविध राज्यांच्या राजधानींमध्ये आयोजित मोर्चामध्ये भाग घेतील. देशभरात आंदोलने सुरू असून विविध संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकत्व कायद्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.