फुफ्फुसात रक्ताच्या गाठी असणाऱ्या एका रुग्णाच्या मुलाने प्रश्न मांडला आहे..
प्रश्न : माझ्या वडिलांचे वय ५७ वर्षे आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. तपासण्या झाल्यानंतर, डॉक्टरानी सांगितले की, त्यांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. ही समस्या काय आहे? फुफ्फुसात रक्ताच्या गाठी का होतात? यावर उपाय काय आहे?असा आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? कृपया स्पष्ट करावे.
उपाय:हा आजार म्हणजे तुमच्या वडिलांना पल्मोनरी 'थ्रोम्बोइम्बोलीझम' म्हणजे फुफ्फुसात रक्तवाहिनीतील रक्त प्रवाहात गाठीमुळे अडथळा आला आहे. जरी ही समस्या फुफ्फुसाची वाटत असली तरी ती मूळ पायातील रक्तवाहिनीतून उद्भवते, हे उल्लेखनीय आहे. मानवी शरीरात, अशुद्ध रक्त हृदयात रक्तवाहिन्यातर्फे आणि त्यानंतर फुफ्फुसात पोहोचते. तेथे हे रक्त प्राणवायू घेते आणि नंतर धमन्यांच्या मार्फत पुन्हा हृदयात जाऊन मग शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
मात्र, काही लोकांमध्ये, पोटऱ्या आणि मांड्यांमध्ये लहान गाठी निर्माण होतात. यामुळे रक्ताभिसरणाची गती कमी होते, रक्तवाहिन्यांच्या भिंतीना इजा होते आणि रक्त घट्ट होते, आदी समस्या निर्माण होतात. जे लोक हात आणि पायांची हालचाल न करता अनेक तास बसून असतात, त्यांच्यासाठी ही समस्या जास्त उद्भवणारी असते. काहीवेळा, पायाच्या शिरांमध्ये निर्माण झालेल्या गाठी तिथून सरकतात आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांत अडकून बसतात. त्यामुळे, फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पुरेसा प्राणवायू न मिळालेले रक्त परत हृदयात येते. रक्तात पुरेसा प्राणवायू नसल्याने, श्वसन करण्यास त्रास होतो. फुफ्फुसे आकुंचन पावतात आणि छातीत वेदना होऊ शकतात.