शिमला -हिमाचल प्रदेशातील आदिवासी जिल्हा लाहौल स्पीती येथील डोंगराळ भागांत हिम बिबटे (स्नो लेपर्ड) आढळून येत आहेत. डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या किब्बर चिचम, काजा या भागांसह लगतच्या डोंगरांमध्ये लुप्त होत चाललेला हा हिम बिबट्या आढळून आला आहे. शेकडो पर्यटक बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या या बिबट्यांना पाहण्यासाठी स्पीती दरीकडे येत आहेत.
स्पीती येथील पिन व्हॅली, नॅशनल पार्क, चंद्रताल वन्यजीव अभयारण्य आणि किब्बर वन्यजीव अभयारण्य येथील कॅमेऱ्यांनी बर्फाळ प्रदेशातील बिबट्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. वन विभागाने 'स्नो लेपर्ड'च्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी अनेक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत.
मागील वर्षीही स्पीती दऱ्याखोऱ्यांमध्ये तब्बल 35 बिबटे कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, सध्या हिम बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामागे थंड प्रदेशात सापडणाऱ्या आयबेक्स आणि ब्लूशिपसारख्या प्राण्यांची संख्या वाढणे हे मुख्य कारण आहे. हे प्राणी येथील चराऊ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
वन विभागाने 2012 मध्ये 'प्रोजेक्ट स्नो लेपर्ड' च्या माध्यमातून बर्फाळ प्रदेशातील बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. तेव्हा या परिसरात चार हिम बिबटे आढळले होते. मात्र, आता स्पीतीबाहेर लाहौल घाटीमध्येही त्यांची संख्या वाढत आहे.