नवी दिल्ली - शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या राजीव मेट्रो स्थानकावर काही तरुणांनी 'देश के गद्दारों को, गोली मारो...' अशा घोषणा दिल्याची घटना घडली आहे. यासंबधी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला असून सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
मेट्रो स्थानकावर 6 व्यक्तींनी 'देश के गद्दारों को, गोली मारो...' अशा घोषणा दिल्या. तसेच संबधीत तरुणांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थही घोषणा दिल्याची माहिती आहे. तरुणांना घोषणाबाजी करताना पाहून स्थानकांवरील काही लोकांनी संबधीत तरुणांच्या सुरात सूर मिसळत घोषणाबाजी केली.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून यासंबधीत टि्वट करण्यात आले आहे. '29 फेब्रुवरीला 6 युवक राजीव मेट्रो स्थानकावर घोषणाबाजी करताना आढळली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले असून दिल्ली मेट्रो पोलीसांकडे सोपवले आहे', असे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान दिल्लीमधील परिस्थिती सामान्य आहे. ईशान्य दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले आहेत. तर ६३० जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात आला आहे.
हेही वाचा -#दिल्ली हिंसाचार : मुस्तफाबाद भागात दोन भावांची हत्या, कालव्यात सापडले मृतदेह