महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात 3 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 48 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पद्म पुरस्काराने सन्मान झालेले मान्यवर

By

Published : Mar 16, 2019, 10:57 PM IST

Updated : Mar 16, 2019, 11:51 PM IST

मुंबई- प्रसिध्द उद्योजक अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण, तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्काराने सन्मान झालेले मान्यवर

पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात 3 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 48 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातुर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली आहे. या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना रास्तदरात आरोग्य सुविधा पुरवण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

या समारंभात ४८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोज वाजपेयी हे अभिनयाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिध्द असून पठडीबाहेरच्या भूमिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. चित्रपटांतील वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी त्यांना यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. दुष्काळी भागातील गुरांची देखभाल करण्यात सय्यद शब्बीर यांचे अमूल्य योगदान आहे. गेल्या ५० वर्षांपासून गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचे काम ते अव्याहतपणे करत आहेत.

प्रसिध्द अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काँट्रॅक्टर हे विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असून पारसी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. काँट्रॅक्टर यांनी चित्रपटांमधून साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या आहेत. सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रा. सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. काटे यांनी भारत देशात सिकसेल आजाराबाबत संशोधन क्षेत्राचा पाया रोवला. प्रा. काटे हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील आदिवासी भागांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य करीत आहेत. गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ११२ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ११ मान्यवरांचा समावेश होता. पैकी ६ जणांना आज सन्मानित करण्यात आले. ११ मार्च २०१९ रोजी पद्मपुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यात ४ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Last Updated : Mar 16, 2019, 11:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details