जयपूर (राजस्थान) - राजधानीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवार पहाटे तीन वाजता सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरुच होता. तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने 6 जणांचा बुडून मृत्यू झाला.
राजस्थानाच्या जयपुरमध्ये मुसळधार पाऊस; 6 जणांचा मृत्यू कार वाहून 3 जणांचा मृत्यू
जयपूरच्या कानोता परिसरात एक कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये 6 जण प्रवास करत होते. यातील 3 जणांचा कार बुडाल्यामुळे मृत्यू झाला. तर तेच खोनागोरिया परिसरात पाण्याचा प्रवाह खूप जोरात असल्याने नाल्यात वाहून एका जणाचा मृत्यू झाला. तर सोडाला ठाणे परिसरातही एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
शास्त्री नगरमधील भट्टा बस्तीतही मुसळधार पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अनेक परिसरांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.
जलमहलच्या जवळील परिसरात पावसाचा वेग जास्त असल्याने एक घर कोसळले. यामुळे तीन लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.