नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, काश्मीर प्रशासनाने त्यांना परत पाठवले आहे. 'काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नसून त्यामुळेच आम्हाला तेथील नागरिकांना भेटू दिले नाही', असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
'काश्मीरमधील स्थिती असामान्य, पत्रकारांना मारहाण', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
'काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नसल्यामुळेच आम्हाला नागरिकांना भेटू दिले नाही', असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
'काही दिवसांपूर्वीच मला राज्यपालांनी काश्मीरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. तिथल्या नागरिकांची परिस्थिती काय आहे. हे आम्हाला पाहायचे होते. मात्र, आम्हाला काश्मीरमध्ये जाऊ दिले नाही. आमच्यासोबत गैरवर्तन केले तर, माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केली. यातून हेच स्पष्ट होते की, राज्यातील स्थिती सामान्य नसून भितीदायक आहे', असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा ही ज्येष्ठ नेते मंडळी होती.