नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून चीन आणि भारत सीमेवर संघर्ष सुरू असून तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सीमेवरील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. 'सीमेवरील परिस्थिती गंभीर असून भारतीय सैन्य सावधगिरीची पावले उचलत आहे. तसेच कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी ते तयार आहेत', असे नरवणे यांनी सांगितले.
'मी गुरुवारी लेहमधील अनेक भागांची पाहाणी केली. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सैन्यांचे मनोबल उच्च आहे. उद्भवू शकणार्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत. भारतीय जवान हे जगात सर्वोत्तम आहेत. ते केवळ सैन्याचाच नव्हे, तर देशाचा अभिमान वाढवतील, असेही नरवणे म्हणाले.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सीमेवर तणाव असून परिस्थिती नाजूक आणि गंभीर आहे. चीनसोबत वाद सोडवण्यासाठी चर्चा सुरू आहेत. चर्चेच्या माध्यमातून वाद सुटेल, असा विश्वास लष्करप्रमुख नरवणे यांनी व्यक्त केला.
29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याने सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पुन्हा एकदा चीनच्या 118 अॅप बंदी घातली आहे. दरम्यान, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करीस्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. जुलैच्या मध्यावधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे.