कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत सीएए विरोधात आंदोलन
राजधानी दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. या कडाक्याच्या थंडीतही नागरिक जामा मशिदीबाहेर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. या कडाक्याच्या थंडीतही नागरिक जामा मशिदीबाहेर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. कायदा मागे घ्यावा अशी मागणी आंदोलक करत आहेत.
जामा मशिद परिसरातील नागरिक मागील एक आठवड्यापासून शांततेत आंदोलन करत आहेत. सरकार आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करेल याचा आम्हाला विश्वास आहे. असे एका आंदोलकाने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. आंदोलक सीएए विरोधी पोस्टर घेवून कायद्याचा निषेध करत आहेत.
आम्ही शांततेत आंदोलन करत असलो तरी पोलिसांनी आम्हाला आंदोलन थांबवण्यास सांगितल्याचे एका आंदोलकाने सांगितले. उघडपणे सांगायचे म्हणजे, सरकार हा कायदा मागे घेईल, असे मला वाटत नाही. या कायद्याविरोधातील आंदोलनात अनेक जणांचे प्राण गेले आहेत, असे म्हणत एका आंदोलकाने राग व्यक्त केला.
जामा मशिद परिसरासह दिल्लीतील अनेक भागात संचारबंदी लागू आहे. कोणतही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारी घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.