नवी दिल्ली -गोकुळपुरी येथे झालेल्या हिंसाचारादरम्यान शीख पिता-पुत्रांनी ७० मुस्लिमांचे प्राण वाचवले आहेत. २४ फेब्रुवारीला येथे हिंसाचार सुरू असताना भेदरलेल्या ७० मुस्लिमांना या पिता-पुत्रांनी सुरक्षित स्थळी पोहोचवले. स्वतःच्या दुचाकीवरून अनेक फेऱ्या करत या दोघांनी मुस्लीम कुटुंबांचे जीव वाचवले.
मोहिंदर सिंग आणि त्यांच्या मुलाने दिल्लीतील दंगे आणि हिंसाचार पाहून १९८४च्या शीखविरोधी हिंसाचाराची आठवण झाल्याचे सांगितले. या दोघांनी गोकुळपुरी मार्केट येथून कर्दमपुरी येथे या मुस्लीम कुटुंबांना पोहोचवले.
'मी आणि माझ्या मुलाने ६० ते ७० मुस्लिमांना हिंसाचार सुरू असताना सुरक्षित स्थळी पोहोचवले. मी स्कूटरवरून आणि माझ्या मुलाने त्याच्या बुलेटवरून २० फेऱ्या केल्या. ते सर्व मुस्लीम भेदरलेले होते. आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्णय घेतला,' असे मोहिंदर म्हणाले.
'मी १९८४ची शीखविरोधी दंगल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. आम्ही मुस्लीम पुरुषांना ते त्यांच्या दाढीमुळे कोणाला ओळखू येऊ नयेत म्हणून पगडी घालण्यास दिली. त्यांच्यासोबत महिला आणि लहान मुलेही होती. आम्ही सर्वांत आधी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले,' असे ते म्हणाले.