पणजी- माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अंतिमक्षणी दिलेला 'बी पॉझिटिव्ह' हा संदेश घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभा प्रचाराला सुरुवात केली होती. मागील २५ वर्षांपासून पणजीकरांचे भाजपशी असलेले नाते या निवडणुकीतील विजयाने अजून दृढ होईल, असा विश्वास भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मतदानानंतर व्यक्त केला.
पणजीवासीयांचे भापजसोबतचे नाते दृढ होईल - कुंकळ्येकर
मागील २५ वर्षांपासून पणजीकरांचे भाजपशी असलेले नाते या निवडणुकीतील विजयाने अजून दृढ होईल, असा विश्वास भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मतदानानंतर व्यक्त केला.
पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार म्हणून कुंकळ्येकर निवडणूक रिंगणात आहेत. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कुंकळ्येकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ते आमदार म्हणून निवडूनही आले होते. तर 2017 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा त्यांनाच भाजपकडून उमेदवार देण्यात आली होती. ते विजयी झाले परंतु, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यासाठी कुंकळ्येकर यांनी ही जागा सोडली होती. आता पर्रीकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. तेव्हा पुन्हा कुंकळ्येकर यांनाच पक्षाने उमेदवार म्हणून संधी दिली आहे.
पुढे बोलताना कुंकळ्येकर म्हणाले, मागील 40-45 दिवस लोकसभा प्रचारासोबत भाजप कार्यकर्ते प्रचार करत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आमच्या सोबत नाहीत. परंतु, त्यांनी दिलेली शिकवण आमच्याकडे आहे. त्यामुळे पणजी एक जागतिक दर्जाचे सुंदर शहर बनविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. पणजी विधानसभेसाठी मागील 25 वर्षे येथील मतदार भाजपला निवडून देत आहे. याही निवडणुकीत भाजपला विजयी करतील आणि हे नाते अजून दृढ होईल, असा विश्वास आहे.