पणजी - प्रत्येक खेळाडूला मैदानी खेळ खेळण्यासाठी मजबूत शरीरयष्टीची गरज असते. योग अभ्यास केल्यास मानसिक व शारीरीकदृष्या खेळाडू मजबूत बनतो. शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखून त्यांना खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. राज्याच्या क्रीडा धोरणामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर योग शिक्षणाची सक्ती करावी, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
कुजिरा-बांबोळी येथे गुरूवारी धेंपो कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच सरकारी महाविद्यालय-साखळी यांच्या संयुक्त विद्यामाने ‘ऑलिम्पिक डाऊन दी एजिस 2020’ हा भौतिक शिक्षण आणि विज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वरूण साहनी, धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन रास्कीना, धेंपो महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राधिका नाईक, सरकारी साखळी महाविद्यालयाचे प्राचार्य जेर्वास्लो मेंडीस, कार्यकारी क्रीडा संचालक वसंत प्रभुदेसाई, गोवा विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी शारिरीक प्रशिक्षक डॉ. प्रदीप देशमुख व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शारिरीक शिक्षणाची प्रत्येक माणसाला गरज आहे. शारिरीक शिक्षणातून आरोग्य सांभाळण्यासाठी लोकांना मोठा लाभ होतो. तसेच शिस्त पालनाचे धडेही शारिरीक शिक्षणातून मिळतात. योगा हा भारतीय क्रीडा प्रकार असून जागतिक पातळीवर योग 21 जूनच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’मूळे परिचित आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकासारख्या देशातील लोकांनी योगाचा प्रकार आत्मसात केलेला आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.