मथुरा (उत्तर प्रदेश)- श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत उत्साहचे वातावरण आहे. मथुरेत तीन दिवस श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. जन्मभूमी परिसरात लीला मंच येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. ढोल नगाऱ्याच्या गजरात मंदिर परिसरात एकाचवेळी 101 शंख वाजवले जाणार आहेत.
मथुरेत श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त देश विदेशातील भाविकांची गर्दी - mathura
देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत उत्साहचे वातावरण असून मथुरेत २३ ते २५ ऑगस्ट, असे तीन दिवस दिवस श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील श्रीकृष्ण जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी आज दुपारी मथुरेत हजेरी लावणार आहेत आणि पाच वाजता जन्मस्थळी उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे देश-विदेशातील हजारो भाविकांनी मथुरेत गर्दी केली आहे. भाविकांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
मथुरेत उत्साहाचे वातावरण असून सगळीकडे श्रीकृष्ण राधेच्या वेशभूषेत नागरिक दिसत आहेत. मथुरेला देखील एखाद्या नवरीप्रमाणे सजवण्यात आले आहे. जन्मभूमीत सकाळपासूनच सांस्कृतिक कार्यक्रम होत असून हे कार्यक्रम बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.