पाटणा (बिहार) - राजद नेते तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बेरोजगारी आणि स्थलांतर या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले. 'माझ्या कुटुंबावर भाष्य करून मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. शिवाय ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात, पण ते जनतेवर परिणाम करणारे महागाई आणि भ्रष्टाचारासारख्या खऱ्या मुद्द्यांवर बोलणार नाहीत,' असे तेजस्वी यादव म्हणाले.
'नितीशजी हे मान्य करतात की, आपल्या सरकारच्या 15 वर्षांत त्यांनी राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि उद्योगांचा सत्यानाश केला. त्यांनी दोन पिढ्यांचे वर्तमान आणि भविष्यही उद्ध्वस्त केले. ते बेरोजगारी, रोजगार, उद्योग, गुंतवणूक आणि स्थलांतर याविषयी काहीही बोलत नसल्याचे हेच कारण आहे. त्यांनी या मुद्द्यांवर का बोलू नये?' असा सवालही तेजस्वी यादव यांनी केला आहे.
'माझ्या कुटुंबावर भाष्य करून नितीशकुमार पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. कारण, त्यांनाही 6 भावंडे आहेत. अशी भाषा वापरुन नितीशकुमार यांनी महिलांचा आणि माझ्या आईच्या भावनांचा अपमान केला आहे. ते महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इत्यादी मुख्य मुद्द्यांवर बोलत नाहीत. ते फक्त आम्हाला शिवीगाळ करू शकतात,' अशी प्रतिक्रिया यादव यांनी नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर दिली आहे. नितीश कुमार यांनी आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना 'नऊ मुले' असल्यावरून विनोद केला होता.
हेही वाचा -कोविड-१९ मॅनेजमेंटबाबत 'आयुष'चे आंतरराष्ट्रीय वेबिनार; जगातील पहिलाच प्रयोग