नवी दिल्ली -राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राज्यात लवकरच किंबहुना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री नेतृत्व करत असलेले सरकार स्थापन होईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिल्ली येथील पत्रकार परिषदेत राऊत यांनी राज्यातील सत्ता स्थापनेबाबत अनेक महत्त्वाची विधाने केली आहेत.
हेही वाचा... धक्कादायक ! पनवेलमध्ये सख्ख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार
उद्या दुपार पर्यंत स्पष्ट होणार चित्र
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आज बुधवारी होत असलेली बैठक ही निर्णायक असेल, आणि उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारपर्यंत राज्यातील सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट झालेले असेल, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा... 'शिवसेनेशिवाय राज्यात सरकार नाही व मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच'
राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. त्यात राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलेले नाही. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा... सोपान महाराजांवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इंद्रायणी घाटावर अंत्यसंस्कार
पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीर बाबींमधून जावे लागते. तसेच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असे राऊत यावेळी म्हणाले.