नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेमध्ये कोरोना संकट, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपाएतर राज्यांशी असलेल्या वागणुकीबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांशी मोदींनी निधी व सोयीसुविधा देताना सावत्रपणाचा व्यवहार करू नये, असे सावंत म्हणाले. महाराष्ट्र कोरोनासोबत कसा लढत आहे याबाबतही त्यांनी माहिती दिली.
पंतप्रधानांनी अचानक २४ मार्चला लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे काही तासातच लाखो लोक रस्त्यावर आले. सोशल डिस्टन्सिंगचा त्याच दिवशी बोजवारा उडाला होता. रेल्वे सेवाही बंद करण्यात आली. यात लाखो नागरिकांचे हाल झाले. पायी घरी जाताना अनेकांचे जीव गेले. नंतर रेल्वे सेवा सुरू केली तर अक्षरश: लोक गाड्यांखाली येऊन मरण पावले. हे सर्व टाळता आले असते जर पंतप्रधानांनी राज्यांना दोन दिवस अगोदर लॉकडाऊनची कल्पना दिली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही, अशी टीका सावंत यांनी केली.