मीरा भाईंदर(ठाणे) - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला धमकी दिली आहे. कंगना मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे सरनाईक म्हणाले आहेत. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत: होऊन(सु-मोटो) दखल घेतली आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रताप सरनाईक यांना तत्काळ अटक करा, कंगना रणौतवरील वक्तव्यानंतर महिला आयोगाची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला ट्विटरवरून थेट धमकी दिली आहे. ते म्हणाले की, कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे ते म्हणाले होते.
प्रताप सरनाईक यांचे ट्विट आमदार प्रताप सरनाईक यांनी एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. कंगना राणावत हिने चुकीच्या पद्धतीने ट्विट केलं आहे. मुंबई आमची जननी आहे. कंगना रणौत आहे कोण ही चिल्लर आहे. तसेच ९ तारखेला मुंबई मध्ये येणार आहेस सांभाळून रहा आणि यापुढे आमच्या नेत्यावर टीका करण्याअगोदर विचार कर. अपशब्द काढत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला.
काय म्हणाल्या रेखा शर्मा?
यावर आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील आमदार प्रताप सरनाईक यांना एका महिलेला धमकी देण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना तत्काळ अटक करण्यासाठी आयोग महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहणार आहे. महाराष्ट्र हा भारताचा भाग असून देशातील कोणताही व्यक्ती पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात जाऊ शकतो. व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य असल्याने कोणी काहीही बोलू शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही, राजकीय नेता महिलेला अशा प्रकारे धमकी देऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेच्या प्रताप सरनाईक या आमदाराला तत्काळ अटक व्हायला हवी, असे त्या म्हणाल्या.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. काल तिने शिवसेना आपल्याला मुंबईत येऊ नकोस अशी धमकी देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आज तिने ९ तारखेला मुंबईत येत असून ज्याच्यांत हिम्मत असेल त्याने आपल्याला रोखून दाखवावं, असे म्हणत शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.
कंगनाच्या वादग्रस्त विधानाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिलंय, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.