सांगली - समस्त मुस्लीम समाजाकडून सांगलीमध्ये आज (मंगळवार) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी काढण्यात येणारी शाही मिरवणुकीला फाटा देत शिवाजी महाराज आणि हुतात्मा जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गोरगरीबांना ३०० धान्य, ब्लँकेट आणि साड्यांचे वाटप करत हुतात्मा कुटुंबांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
सांगलीत मुस्लीम समाजाकडून शिवजयंती साजरी; हुतात्मा कुटुंबांना प्रत्येकी २५ हजाराची मदत
समस्त मुस्लीम समाजाकडून सांगलीमध्ये आज (मंगळवार) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी काढण्यात येणारी शाही मिरवणुकीला फाटा देत शिवाजी महाराज आणि हुतात्मा जवानांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्यदलात असणाऱ्या मुस्लीम सरदारांचा इतिहास समाजासमोर यावा, या उद्देशाने सांगलीतील समस्त मुस्लीम समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदारांची प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात येते. यंदाच्या वर्षी नुकत्याच झालेल्या काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला फाटा देत साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.
शहरातल्या स्टेशन चौकात यावेळी ही जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेवत समाजातील ३०० गोरगरीब कुटुंबांना धान्य, ब्लँकेट आणि महिलांना साड्या वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याहस्ते यावेळी वाटप करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, काँग्रेसची युवक नेते विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते. मुस्लीम समाजाचे नेते असिफ बावा यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.