पाटणा - बिहार निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बॉलिवूड अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हादेखील उतरला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतून लव सिन्हा राजकीय पदार्पण करणार आहेत. लव सिन्हा यांना काँग्रेसने पाटणा जिल्ह्याच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
लव सिन्हा यांची आतापर्यंत कोणतीही राजकीय ओळख नाही. त्यांचा सामना भाजपचे सद्य आमदार नितीन नवीन यांच्याशी होणार आहे. बाकीपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून नितीन नवीन गेल्या तीन वेळेस निवडूण आले आहेत. तसेच जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी ही बांकीपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यांनी प्लूरल्स पक्षांची स्थापना केली आहे.