नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यानंतर विविध क्षेत्रांतून आणि नागरिकांमधूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. आज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर टि्वट करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले आहे. सिन्हा यांनी उद्धव ठाकरे यांना महान म्हटले. तर संजय राऊत यांची हनुमानासोबत तुलना केली आहे.
'उद्धव ठाकरे महान; तर संजय राऊत हनुमान, शत्रुघ्न सिन्हांनी केले कौतुक.. - Sanjay Raut Hanuman
आज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर टि्वट करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचे कौतूक केले आहे.
'महान उद्धव ठाकरे, तर हनुमानासारखे आमचे संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये कौतूकास्पद कामगिरी केली आहे. याचे फळ त्यांना लवकरात लवकर मिळेल, याचा मला विश्वास आहे. मी आधीच म्हटले होते की, पिक्चर अभी बाकी है...! फक्त 1 ते 2 दिवस वाट पाहा चित्र स्पष्ट होईल. सत्यमेव जयते या वाक्यानुसार आपल्या सर्वांनाच विजेता माहीत आहे, असे सिन्हा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला होता. मात्र, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, शनिवारी सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.