जयपूर - देशात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे, जे इथल्या नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पाडत आहे, असा आरोप काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला. ते जयपूरमधील साहित्य संमेलनातील 'शशी ऑन शशी' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मायकल डवायर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
जयपूर साहित्य संमेलनात शशी थरूर यांची चौफेर फटकेबाजी; आरएसएसलाही केले लक्ष्य यावेळी थरूर यांनी विविध विषयांवर दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यामध्ये पुस्तके, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आठवणी तसेच राजकीय विषयांचाही समावेश होता. धर्माबाबत बोलताना ते म्हणाले, की महात्मा गांधी, नेहरू आणि इतर अनेक नेत्यांच्या मते, भारताची ओळख हा कोणताही विशेष धर्म नाही. सर्वच धर्मांसाठी आपण स्वातंत्र्यलढा लढलो आहोत.
ते पुढे म्हणाले, की आज देशात वेगळ्याच प्रकारचे वातावरण तयार झाले आहे. गांधींना ज्याने मारले होते, तो आरएसएसचा होता. मात्र, लोकांचे विचार आजही बदलले नाहीत. देशात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे, जे इथल्या नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पाडत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना थरूर यांनी भाजपला चांगलेच लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, की हिंदुत्व म्हणजे न्याय करणे, माझ्या सत्याला तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या सत्याला मी पाठिंबा देईल. मात्र, या सरकारला वाटते, की ज्या प्रकारचे काम ते करत आहेत, तेच खरे हिंदुत्व आहे, बाकी काही नाही.
हेही वाचा : 'मोदी-शाहंच्या तोंडी हिटलरची भाषा' भूपेश बघेल यांचा हल्लाबोल