नवी दिल्ली -काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. 'सध्या काँग्रेसला नेतृत्व नसल्यामुळे पक्षाची स्थिती ढासळत आहे. अध्यक्षपदी कोणीच नसल्यामुळे पक्षामध्ये एक प्रकारची पोकळी जाणवत आहे,' असे ते म्हणाले. त्यांच्या या विचाराला कर्नाटकातील वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांचाही दुजोरा मिळाला आहे.
'माझ्या मते, २-३ महिन्यांसाठी काँग्रेसच्या अध्यक्षपदी हंगामी नेमणूक करण्यात यावी. या कालवधीत अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात यावी. सर्व पदांवरील कार्यकर्त्यांना ही निवडणूक लढवण्याची परवानगी मिळावी. ज्या व्यक्तीला ही निवडणूक लढवण्याची इच्छा असेल, त्यांनी अर्ज करावेत. या पद्धतीने निवडलेल्या नेत्यामध्ये अधिक योग्यता आणि विश्वासार्हता असेल,' असे थरूर म्हणाले.
'पक्षात एक प्रकारची पोकळी जाणवत असल्याने अनेक खासदार आणि पक्षातील इतर सहकारी मागील २ महिन्यांपासून अस्वस्थ आहेत. कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. कोणतीही बाब साध्य झालेली नाही. याचा परिणाम म्हणून गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आणि कर्नाटकातही काँग्रेसला सत्ता गमवावी लागली,' असेही थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकातील वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनीही या कल्पनेचे स्वागत केले आहे. थरूर यांनी सर्वसाधारण काँग्रेस कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'सध्या काँग्रेस पक्ष अनाथ झालेला नाही. काँग्रेस अध्यक्षांनी स्वतःहून पदावरून बाजूला होणे पसंत केले आहे. मात्र, ती जागा दुसऱ्या व्यक्तीने घेईपर्यंत त्यांनी पदाचे कार्य सुरूच ठेवले आहे. ते पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत,' असे वेणूगोपाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाची कमान एखाद्या युवा नेत्याकडे देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या पदासाठी राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी या सध्या अधिक योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी या पदासाठी निवडणूक लढवावी की नाही, हा सर्वस्वी गांधी कुटुंबाचा निर्णय असणार आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत १७ व्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरूनही 'Congress President' हे पद काढून टाकले होते.