पाटना - देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमामला अटक केली आहे. भारतापासून आसाम राज्य वेगळे करा, असे वक्तव्य त्याने केले होते. बिहारमधील जहानाबाद येथून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज(मंगळवार) त्याला अटक केली.
देशद्रोहाच्या आरोपाखाली शरजील इमामला बिहारमधून अटक अटक केल्यानंतर पोलीस त्याला दिल्लीमध्ये घेऊन येत आहेत. त्यानंतर इमामला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांशिवाय आसाम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तरप्रदेश पोलिसही शरजील इमामच्या मागावर होते.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात केले होते वादग्रस्त वक्तव्य
मागील डिसेंबर महिन्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रदर्शनात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पुर्वकडील राज्यांना जोडणारा भाग म्हणजे चिकन्स नेक( चिंचोळा भूप्रदेश) तेथे चक्का जाम करुन आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. या वक्तव्या नंतर दिल्ली, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तरप्रदेशात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहानाबादमध्ये बसला होता लपून
क्राईम ब्रॅन्चची पाच पथके त्याचा शोध घेत होती. बिहारमधील जहानाबादमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी जहानाबाद येथील काको पोलीस ठाणे क्षेत्रातून त्याला अटक केली. दिल्लीत आणल्यावर त्याची सखोल चौकशी होणार आहे.