उन्नाव बलात्कार: 'गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर, ही वेळ आली नसती' - unnav abuse victim
उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला पेटवून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी, असेही पवार म्हणाले आहेत.
संग्रहित छायाचित्र
लखनौ- उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला पेटवून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बलात्कारानंतर तक्रार दाखल केलेल्या तरुणीला पेटवून दिल्याची बातमी एकून धक्का बसला. जर गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर ही वेळ आली नसती, असे शरद पवार म्हणाले.
आज(गुरुवारी) उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. बिहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. बलात्कार खटल्यासंदर्भातील कामासाठी पीडिता रायबरेलला जात असताना ५ जणांनी पीडितेला पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये पीडिता गंभीररित्या भाजली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवम त्रिवेदी हा जामिनावर बाहेर आला असता त्याने हे कृत्य केले. याप्रकरणातील इतर ४ ओरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर उत्तरप्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्चही सरकार करणार आहे. याबाबत योगी आदित्यनाथ यांनी एक पत्रक जारी केले आहे.