सातारा - सातारा ईव्हीएम मशीनमध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटते. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ईव्हीएम यंत्राबाबत आपल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्याचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ''माझ्या समोर हैदराबादच्या आणि गुजरातच्या काही लोकांनी मशीन ठेवली आणि म्हणाले दाबा बटन. मी घड्याळावर दाबलं आणि तिथे कमळावर गेलं, हे मी स्वतः पाहिलंय. सगळ्याच मशिनमध्ये असे असेल असं मी म्हणत नाही. हे मी पाहिलेलं आहे म्हणून मी त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली. पुन्हा आम्ही न्यायालयामध्ये गेलो, पण तिथे आमचं म्हणणं न्यायालयाने मान्य केले नाही.''