महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिन्मयानंद खटला : पीडित विद्यार्थिनीला अखेर जामीन मंजूर - allahabad high court news

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या तरुणीला अखेर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

चिन्मयानंद खटला
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Dec 4, 2019, 6:19 PM IST

लखनौ- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या तरुणीला अखेर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चिन्मयानंद यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीला चिन्मयानंद यांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आता याप्रकरणी न्यायालयाने पीडित तरुणीला जामीन मंजूर केला आहे.

शहाजहापूर येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी चिन्मयानंद यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. आरोप करणाऱ्या तरुणीवर आणि तिच्या मित्रांवर चिन्मयानंद यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. २५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या तरुणीला अटक केली होती. तब्बल दोन महिन्यानंतर तिची सुटका करण्यात आली आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी पीडितेच्या तीन मित्रांनाही अटक करण्यात आली होती.
५ कोटींची खंडणी स्वामी चिन्मयानंद यांना मागितल्याचा आरोप या तिघांवर आहे. सचिन, विक्रम आणि संजय सिंह असे तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. तरुणीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे उत्तरप्रदेश राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही तरुणीच्या बचावासाठी धावून आल्या होत्या. तरुणीला अटक करण्यात आल्यानंतर 'हाच भाजप सरकारचा न्याय का'? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच प्रशासन चिन्मयानंद यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details