'बाबरी निकालावर उत्सुकता ताणलेली, मात्र संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा'
अयोध्येतील बाबरी जमीन वाद निकालावरून दोन्ही पक्षकारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी जनतेला केले आहे.
संग्रहीत छायाचित्र
नवी दिल्ली - अयोध्येतील बाबरी जमीन वाद निकालावरून दोन्ही पक्षकारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी जनतेला केले आहे. याबाबतचे एक पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
अयोध्या निकाल देशाची परीक्षा पाहणारा आहे. या निकालावरून सरकार कसे वागत आहे, याकडेही लक्ष ठेवून असल्याचे बुखारी यांनी सांगितले. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादग्रस्त जमिनीविषयीचा निर्णय राखून ठेवत असल्याचे न्यायालयाने १६ ऑक्टोबरला म्हटले होते. सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर आता या वादावर लवकरच निर्णय येणार आहे. १७ नोव्हेंबरला म्हणजेच सरन्यायाधीश गोगोई यांच्या कार्यकाळ संपायच्या आत या प्रकरणी निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची भेट घेतली. अयोध्या वादग्रस्त जमीन निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाविषयी ही भेट झाली. अयोध्येमध्ये या आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच भडकाऊ वक्तव्य करणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.