मिर्झापूर - चुनार पोलीस ठाणे क्षेत्रातील सोनपूर गावात जमिनीचे खोदकाम करताना व्हिक्टोरिया कालीन चांदीची नाणी सापडली आहेत. त्यानंतर गावात खळबळ उडाली होती. तसेच, या नाण्यांच्या मालकीवरूनही जोरदार वादावादी झाली. यानंतर उपजिल्हाधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचत ही नाणी आपल्या ताब्यात घेतली.
मोतीलाल यांच्या जमिनीचे खोदकाम सुरू होते. पोकलँड मशीनद्वारे खोदकाम चालू असताना हि विक्टोरिया कालीन चांदीची नाणी चालकाला दिसली. यानंतर त्याने खोदकाम बंद करून कुतुहलाने ही नाणी गोळा करून पाहिली. खोदकाम थांबल्याने जमिनीचे मालक मोतीलाल या जागी पोहोचले. पोकलँड चालक आणि मोतीलाल यांच्यात या नाण्यांच्या मालकीवरून जोरदार वादावादी सुरू झाली. यामुळे ही बाब आजूबाजूच्या लोकांना समजली.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत लोकांना पांगवले. कालच्या या घटनेनंतर रात्रभर गावात पोलीस बंदोबस्त होता. आज उपजिल्हाधिकारी जंगबहादुर यादव यांनी घटनास्थळी पोहोचून ही नाणी ताब्यात घेतली.