चंदीगड -हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील लोकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर सात पोलीस जखमी झाले आहेत. अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका गुंडाला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांचे एक पथक गेले होते, त्यावेळी गावातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
सिरसामधील देसु जोधा या गावातील कुलविंदर सिंग याला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांचे एक पथक गेले होते. त्यावेळी, पोलिसांना विरोध करण्यासाठी गावातील काही लोकांनी एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला केला. यानंतर झालेल्या हाणामारीमध्ये कुलविंदर याचे काका जग्गा सिंग यांचा मृत्यू झाला, तर दोन पोलिसांना बंदुकीची गोळी लागली.
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे. यामध्ये गावातील लोक पोलिसांना काठ्या, विटांनी मारहाण करताना दिसत आहेत. लोकांनी पोलिसांना मारत, त्यांची गाडीही पेटवून लावली. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंजाब पोलिसांची मदत केली.