नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेमध्ये पराभवाची समिक्षा करण्याऐवजी राजीनामा नाट्यालाच वेग आला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रथम राजीनामा देऊन याची सुरूवात केली. त्यानंतर देशातील अनेक नेत्यांमध्ये राजीनामा देण्याची चढाओढच लागली. आतापर्यंत तब्बल १३ नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला. २०१४ च्या निवडणुकांपेक्षा यावेळी केवळ ८ जागा जास्त जिंकता आल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारीणीकडे सोपवला. मात्र, कार्यकारीणीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.