नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. ९ ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी १२. वाजून ०७ मिनिटांनी निधन झाल्याचे एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अनेक महिने आजाराशी सामना करणाऱ्या जेटलींनी आज वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दर्शविला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तशी चिठ्ठीच लिहिली होती. गेल्या १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. त्यामुळे मला मंत्री बनविण्याचा विचार करू नका, असे जेटली यांनी या पत्रात नमूद केले होते.
जेटली 2000पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा ते जवळ जवळ 100 दिवस अर्थ मंत्रालयात आले नव्हते. या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.