नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणी द हेगमधील आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल बुधवारी भारताच्या बाजूने लागला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांनी हा खटला फक्त एक रुपयावर लढला आहे.
हरीश साळवे हे नामवंत वकील म्हणून ओळखले जातात. साळवे एका दिवसांसाठी २५ ते 30 लाख रूपये घेत असल्याचे म्हटलं जातं. देशातल्या मोठ्या उद्योगपतींपासून ते अनेक राजकीय मंडळींचे खटले साळवेंनी लढवले आहेत. मात्र साळवेंनी कुलभूषण जाधव यांची केस लढवायला केंद्र सरकारकडून फक्त 1 रुपया फी घेतल्याचं खुद्द माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट सांगितल आहे. केवळ एक रुपया आकारणाऱ्या हरीश साळवे यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.