हैदराबाद - जगभरात कोविड 19 चे रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. विशेष करून आपल्या देशात रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर जास्त ताण येत आहे. म्हणूनच ज्यांना कमी प्रमाणात लक्षणे दिसत आहेत त्यांना सेल्फ आयसोलेशन म्हणजे स्वत:ला विलगीकरण करा असा सल्ला दिला जात आहे. हैदराबादच्या व्हीआयएनएन हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजीशियन,एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. राजेश वुकला म्हणतात, 'अनेक जण लहान घरात राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आयसीएमआरने स्वविलगीकरणासाठी सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळणे कठीण जाते. जे लोक 1 बीएचके किंवा मोठ्या कुटुंबात राहतात, त्यांना घरी विलगीकरण करणे शक्य नाही. अनेक हाॅटेल्सनी आपल्या रूम्स यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. जर तुम्हाला सौम्य लक्षणे असतील तर तुम्ही तिथे कमीत कमी 2 आठवडे तरी विलगीकरणात राहू शकता. पण संसर्ग पसरू नये म्हणून काही नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.'
संसर्ग झालेल्या व्यक्तीसाठी
- घर खूप लहान असेल तर संसर्ग पसरू नये म्हणून पीपीई किट वापरावा.
- पीपीई किट वापरत असाल तर ड्रेस बदलण्यासाठी वेगळी रूम हवी आणि ती रूम प्रत्येक तासाने सॅनिटाइझ म्हणजे निर्जंतुक करायला हवी.
- पीपीई किटवरच्या सूचना काळजीपूर्वक वाचा. पाकिटात डिस्पोझेबल बॅग दिली असेल तर ताबडतोब त्यात टाकून द्या. ती वेगळी टाकून द्या. इतर कचऱ्यामध्ये टाकू नका.
- तुम्ही घरात एकाच रूममध्ये राहा. अटॅच बाथरूम असलेली रूम हवी.
- निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सर्व कुटुंबाने काटेकोरपणे पाळली पाहिजे.
- मास्क, ग्लोव्ज घाला आणि वारंवार हात साबणाच्या पाण्याने धुवून घ्या.
- चांगले आणि आरोग्यदायी अन्नाचे सेवन करा.
- तुमच्या आरोग्याची तपासणी वारंवार करा. म्हणजे ऑक्सिजनची पातळी, सिंगल ब्रेथ काऊंट, नाडी तपासणे, शरीराचे तापमान तपासणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे.
- तब्येत बिघडते आहे, असे वाटत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत बोलवा.
- तुमच्या डाॅक्टरांशी बोला आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या.
- दिवसभर पुरेसे पाणी प्या.
- योग्य विश्रांती घ्या आणि झोपताना योग्य स्वच्छता ठेवा.