नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. काश्मीर प्रश्नावर केंद्रातील भाजप सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमवेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जात आहे.
काश्मीरमध्ये मोठ्या लष्करी फौजा उतरवण्यात आल्या आहेत. सर्वत्रच सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना पुढील सूचना मिळेपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर शहर व जिल्ह्यामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. श्रीनगरप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही १४४ कलम लागू करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. संचारबंदी मात्र लागू करण्यात आली नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीर सरकारने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमर अब्दुल्लांनी टि्वट करत आपल्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन केले आहे. नॅशनल कॉन्फर्न्सचे नेते फारुख अब्दुला यांनी या कारवाईबद्दल टीका केली आहे. दोन्ही देशांमधील तणावात वाढ होऊ शकेल, असे कोणतेही पाऊल भारत किंवा पाकिस्तानने उचलू नये असे ते म्हणाले.