नवी दिल्ली/लीड्स -आयसीसी विश्वकरंडकातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान हेडिंग्ले मैदानाच्या वरून एक विमान गेले. या विमानातून 'जस्टिस फॉर बलुचिस्तान' आणि 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' असे मोठ्या अक्षरात लिहिलेले बॅनर्स सोडण्यात आले होते. यानंतर अफगाण-पाक संघांचे चाहते मैदानाबाहेरच एकमेकांशी भिडले. या हाणामारीत दोन्ही देशाच्या चाहत्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही झाले.
विमानातून सोडण्यात आलेल्या बॅनर्सच्या माध्यमातून बलुची चळवळीच्या कार्यकर्त्यांद्वारे पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानकडून बलुची नागरिकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली केली जात असल्याच्या विरोधात ही प्रचार मोहीम विश्व करंडक स्पर्धेदरम्यान राबवण्यात येत आहे. 'बलोच रिपब्लिकन पार्टी आणि जागतिक बलोच संघटनेद्वारे पाकिस्तानविरोधात जागरूकता अभियान राबवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून दिवसाढवळ्या बलुची चळवळीतील कार्यकर्त्यांना नाहीसे करण्यात येत आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी या बॅनर्सद्वारे प्रचार करण्यात आला. बळाचा वापर करून जाणीवपूर्वक बलुची कार्यकर्त्यांना नाहीसे करण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी पाकविरुद्ध अफगाण सामन्यादरम्यान या मार्गाचा वापर करण्यात आला,' असे ट्विट जागतिक बलोच संघटनेने केले आहे.
'पाकिस्तानी लष्कर आणि राज्यकर्त्यांकडून कित्येक दशकांपासून बलुची नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत. यातून सुटका व्हावी, बलुची जनतेला न्याय मिळावा, यासाठी जागतिक पातळीवर आवाहन करण्यात आले. जागतिक संघटनेकडेही 'जस्टिस फॉर बलुचिस्तान'ची मागणी लावून धरण्यात आली आहे. यासाठी पावले उचलण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. तसेच, बळाचा वापर करून जाणीवपूर्वक बलुची कार्यकर्त्यांना नाहीसे करण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' हेही अभियान सुरू आहे,' असे दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.