नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रशियाला रवाना होणार आहेत. तेथे ते शांघाय सहकार संस्थेच्या (एससीओ) बैठकीला हजेरी लावतील. या संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमातणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
चार सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्जे शोईजू यांच्यासोबत आणि इतर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत विविध लष्करी कार्यक्रमांबाबत चर्चा करतील. त्यानंतर ५ सप्टेंबरच्या सायंकाळी ते मायदेशी येण्यासाठी निघतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच रशियामध्ये होणाऱ्या बहुपक्षीय युद्धखेळांमधून भारताने माघार घेतली होती. या खेळांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा सहभाग असणार आहे. तसेच एससीओच्या बैठकीला चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघे हेदेखील उपस्थित असणार आहेत. राजनाथ सिंह आणि वेई यांच्यादरम्यान द्विपक्षीय चर्चा होऊ शकते का, असे विचारले असता अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.