नवी दिल्ली - कोरोनामुळे जीव गमावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची हेळसांड होत असून यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना फटकारले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि दिल्ली सरकारना नोटीस पाठवली आहे. दिल्लीतील एलएनजीपी रुग्णालयालाही नोटीस पाठविण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. कोरोना संकट काळात दिल्लीतील रुग्णांची काळजी भयंकर आणि भीतीदायक पद्धतीने घेतली जात आहे, असे म्हणत दिल्ली सरकारला फटकारले. कोरोनाग्रस्तांची अत्यंत भयंकर पद्धतीने काळजी घेतली जात आहे, मृतदेह कचऱ्यातही सापडायला लागले आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.