नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून पालघर प्रकरणी अहवाल मागवला आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालायाने हा अहवाल मागत, पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार असल्याचे जाहीर केले.
पालघर प्रकरणामध्ये पोलिसांनी काहीही हस्तक्षेप केला नाही, अन्यथा तिहेरी हत्याकांड घडले नसते. त्यामुळे या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील १०१ आरोपींवर काल डहाणू न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाने, दाखल तीन गुन्ह्यांपैकी, तिघांच्या हत्येच्या गुन्ह्यात (कलम ३०२) पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने, या गुन्ह्यात न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. उर्वरित दोन गुन्ह्यांपैकी खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा या गुन्ह्यात न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच, या प्रकरणातील आणखी ९ आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली.