नवी दिल्ली - देशातील धार्मिक स्थळे खुली करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्याायालयात दाखल झाली आहे. यावर न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितली आहे. देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, त्यातील काही आता सुरू करण्यात आली आहे. आता सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
'धार्मिक स्थळे खुली करा'... याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मागितले केंद्राकडे उत्तर - धार्मिक स्थळे खुली करा
अहमदाबादेतील 'गीतार्थ गंगा ट्रस्ट' ने देशातील धार्मिक स्थळे खुली करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस पाठविली आहे. अहमदाबादेतील 'गीतार्थ गंगा ट्रस्ट' ने देशातील धार्मिक स्थळे खुली करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मंदिरे खुली करण्यासंबंधी शक्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही केंद्राला नोटीस जारी केली आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. एस बोपन्ना आणि व्ही. राम सुब्रमण्यम यांनीही कामकाजात भाग घेतला होता.
गीतार्थ गंगा ट्रस्ट हे धार्मिक रिसर्च इन्स्टिट्यूट असून वकील सुरजेंदू शंकर दास यांच्यातर्फे याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले आहे की, याचिका दाखल करण्याचा एकमेव आणि पवित्र उद्देश नागिकांच्या मुलभूत हक्काचे रक्षण करणे हा आहे. १४, १९(१) (A) आणि (B), २५, २६, २१ नुसार नागरिकांना धार्मिक हक्क दिले आहेत. मात्र, आत्ताच्या स्थितीत देशातील अनेक मंदिरे बंद आहेत, ती पुन्हा सुरू व्हावीत.