नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया कथित गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज (मंगळवारी) सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता, मात्र, २४ ऑक्टोबर पर्यंत ते सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असणार आहेत.
21 ऑक्टोबरला अटक केल्यापासून पी. चिदंबरम यांची ईडीने फक्त एकदाच चौकशी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सखोल चौकशी न करता ईडी चिदंबरम यांना तुरुंगात ठेवत असल्याचेही बोलले जात होते. त्यांच्या वकिलांनीही याबाबत न्यायालयात युक्तीवाद केला होता. त्यामुळे चिदंबरम यांना जामीन मिळाल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम तिहार तुरुंगामध्ये होते. मात्र, त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने चिदंबरम यांना ताब्यात घेतले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना २१ ऑगस्टला आयएनएक्स गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती. नुकतेच सीबीआयने त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि काही सराकरी अधिकाऱ्यांचे नावही आरोपपत्रात समाविष्ट केले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - INX Media case : पी. चिदंबरम, कार्ती, पीटर मुखर्जीवर सीबीआयचे आरोपपत्र