सर्वोच्च न्यायालयाने माजी बीएसएफ कॉन्स्टेबल तेजबहादूर यांची याचिका फेटाळली - rejection of candidature
तेजबहादूर यादव यांना 'शासकीय सेवेतून भ्रष्टाचार किंवा शासनाशी अप्रामाणिकपणे वागल्याने कमी करण्यात आलेले नाही,' अशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ते सादर न करू शकल्याने यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने माजी बीएसएफ कॉन्स्टेबल तेजबहादूर यादव यांची वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारीची याचिका फेटाळली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने आम्हाला या याचिकेचा विचार करावा असे कोणतेही सबळ कारण दिसत नसल्याचे सांगितले. १ मे रोजी यादव यांची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली होती.
तेजबहादूर यादव यांना 'शासकीय सेवेतून भ्रष्टाचार किंवा शासनाशी अप्रामाणिकपणे वागल्याने कमी करण्यात आलेले नाही,' अशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ते सादर न करू शकल्याने यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी आपल्या अशिलाला बीएसएफमध्ये असताना जेवणाबद्दल तक्रार केल्यामुळे त्रास देण्यात आला, असे म्हटले होते.
समाजवादी पक्षाने २९ एप्रिलला यादव यांना वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवारी दिली होती. त्याआधी ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी वाराणसीतून ३.३७ लाखांच्या मताधिक्याने आपचे अरविंद केजरीवाल यांना हरवून जिंकून आले होते. १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यात वाराणसीत मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.