नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधानांवर निशाणा साधला. सीमा भागाच्या सॅटेलाईट छायाचित्रांनी हे स्पष्ट होत आहे, की चीनने भारताचा काही भूभाग बळकवला आहे, असे गांधी यांनी म्हटले.
हिंदीमध्ये केलेल्या एका ट्विटमध्ये गांधी म्हणतात, "भारताच्या सीमेमध्ये कोणीही शिरकाव केला नाही असे पंतप्रधान म्हणाले, मात्र सॅटेलाईट छायाचित्रांमध्ये तर हे स्पष्ट दिसत आहे, की पांगॉंग तलावाजवळची भारताची जमीन चीनने बळकावली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या पुराव्याचा आधार घेत राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे.
आजच राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधत, पंतप्रधान मोदी हे खरेतर 'सरेंडर मोदी' आहेत अशी टीका केली होती. शुक्रवारी(19 जून) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी चीनने भारतात अतिक्रमण केले नसल्याचे म्हटले होते. यावरून राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांवर टीका केली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले होते.
सोमवारी १५ जूनला भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांमधील सैनिकांदरम्यान झटापट झाली होती. यामध्ये देशाच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तसेच, कित्येक जवान जखमी झाले होते, आणि दहा जवानांना चीनने आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर भारत सरकारने असे स्पष्ट केले होते, की आपला एकही जवान चीनच्या ताब्यात नाही. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनने आपल्या जवानांची सुटका केली होती. या सर्व घटनांनंतर पंतप्रधानांनी शुक्रवारी एक सर्वपक्षीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी चीनने कोणतीही घुसखोरी केलीच नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधक सध्या त्यांच्यावर कडाडून टीका करत आहेत.
हेही वाचा :नेपाळमधील रेडिओ केंद्रांकडून भारतविरोधी प्रचार....सीमावादावरून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न