नवी दिल्ली -हरियाणाची डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेत सपनाने स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांमध्ये यासंबंधी वापरले जात असणारे फोटो जुने आहेत, असेही सपनाने स्पष्ट केले.
माझी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा नाही. मी काँग्रेससाठी प्रचार करणार नाही. माझी राज बब्बर यांच्याशी भेटही झालेली नाही, असेही सपनाने स्पष्ट केले. मी कलाकार असून माझी राजकीय पक्षात जाण्याची इच्छा नसल्याचेही सपनाने नमूद केले.
सपना चौधरींच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सपनाने काँग्रेस सदस्यत्वाचा अर्ज भरतानाचा फोटो समोर आला आहे. या अर्जाचाही फोटो समोर आला आहे. या अर्जावर सपनाची स्वाक्षरीसुद्धा आहे.
सपनाने स्वत:च अर्ज भरला आहे. त्यांच्या बहिणीनेही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेस सचिव नरेंद्र राठी यांनी दिली. आपल्याकडे दोन्ही अर्ज उपलब्ध असल्याचेही राठी यांनी नमूद केले.
दरम्यान, सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती शनिवारी समोर आली होती. यासोबत सोशल मीडियावर सपनाचा प्रियंका गांधींसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हे फोटो जुने असल्याचे सपनाने म्हटले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी टि्वट करत सपनाचे काँग्रेस प्रवेशाबाबत स्वागत केले होते.